। अहिल्यानगर । दि.25 डिसेंबर 2025 । जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रशासनाकडून या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 3 जानेवारीला प्रारूप मतदारयादी प्रसिध्द केली जाणार आहे.
आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी 1 जानेवारी 2026 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
यानुसार 3 जानेवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, 14 फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नव्याने पात्र असलेल्या मतदारांची नोंदणी करणे व दोषरहित मतदार यादी तयार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत 29 डिसेंबर 2025 पर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येईल. यात कोणत्याही मतदान केंद्रावर 1200 पेक्षा जास्त मतदार असणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल.
प्रारूप मतदार यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल. यानंतर 3 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा 7 फेब्रुवारीपर्यंत करून 14 फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अनुषंगाने उद्या, 26 डिसेंबर रोजी राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी व राजकीय पक्षांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
