। अहिल्यानगर । दि.26 डिसेंबर 2025 । पुणे जिल्ह्यातील पेरणे येथे दि. 1 जानेवारी रोजी जयस्तंभ मानवंदना कार्यक्रम होणार असून यावेळी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. पेरणे येथील जयस्तंभ मानवंदना कार्यक्रम नगर- पुणे महामार्गालगत असून कार्यक्रमाकरीता येणार्या नागरिकांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने दि. 31 डिसेंबर ते 2 जानेवारी रोजी 6 वाजेपर्यंत नगर- पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यासंबंधीचा आदेश काढला आहे.
बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणार्या वाहतुकीसाठी बेलंवडी फाटा, देवदैठण, धावलगाव, पिंपरी कोळंडर, उक्कडगाव, बेलवंडी, नगर- दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव, काष्टी, दौंड, सोलापूर- पुणे महामार्गव्दारे पुण्याकडे. नगरकडून पुण्याला सरळ जाणार्या वाहनांकरीता कायनेटीक चौक, केडगाव बायपास, अरणगाव बायपास, कोळगाव,
लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव, काष्टी, दौंड- सोलापूर महामार्गव्दारे पुण्याकडे. नगरकडून पुणेमार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाण्याकडे जाणार्या वाहनांसाठी कल्याण बायपास, आळेफाटा, माळशेज घाट. बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणार्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. शासकीय वाहने, जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी जाणार्या नागरिकांची वाहने, रूग्णवाहिका, अग्निशामक व अत्यावश्यक सेवा यांना नियम लागू राहणार नाही.
