। अहमदनगर । दि.02 मार्च । तालुक्यातील चांदा गावातील कर्डिले वस्तीवर चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. चोरट्यांच्या हल्ल्यात एकाची निर्घृण हत्या झाली आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. प्रसंगावधान राखल्याने चोरट्यांचा डाव फसला असला तरी तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. कर्डिले कुटुंबीय अन् चोरट्यांमध्ये झटापट झाली आहे. चोरट्यांनी चाकूने सपासप वार केल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. कर्डिले कुटुंबातील सदस्यांनी या चोरांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत चोरट्याने आपल्या जवळील चाकूचे सपासप वार कर्डिले कुटुंबातील सदस्यांवर केले. त्यात ओंकार कर्डिले (वय 21) त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बापू भाऊसाहेब कर्डिले आणि गंगाधर बाळा कर्डिले हे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, मृत झालेला ओंकार कर्डिले यांचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. दरम्यान आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सूचना केल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी डिटेक्ट झाल्याची माहिती आहे. या आरोपींनी चांदा गावाजवळच लोहारवाडी इथेही अगोदर चोरी केली होती. त्यानंतर त्यांनी चांदा गावातील कर्डीले वस्तीमध्ये चोरीचा प्रयत्न केला.
Tags:
Breaking