पाच महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार अखेर गजाआड

। अहमदनगर । दि.15 फेब्रुवारी । शहरात दहशत पसरवणारा तसेच सरकारी कामात अडथळा आणणे, आर्म अ‍ॅक्ट, खुनाचा प्रयत्न असे विविध गुन्हे दाखल असलेला आणि गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गजाआड करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. टिंग्या उर्फ भाईजी उर्फ सुमेध किशोर साळवे (वय 25, रा.नीलक्रांती चौक, नगर) असे आरोपीचे नाव आहे. तोफखाना पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

आरोपी टिंग्या उर्फ भाईजी याच्यावर नगर शहरातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, दहशत माजवणे, मारामार्‍या करणे, खुनाचा प्रयत्न करणे यासह आर्म अ‍ॅक्टचे विविध गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात मागील पाच महिन्यांपासून तो फरार होता. 

तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांना टिंग्याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोळंके व त्यांच्या पथकाने नगर शहर व परिसरात तसेच त्याच्या घरी शोध घेतला. टिंग्याने त्याचा मोबाईलही बंद केलेला होता.

पोलिसांनी तो वापरत असलेल्या दुसर्‍या मोबाईलचा गोपनीय तपास करून, ज्या व्यक्तीचा तो मोबाईल वापरत होता, त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून माहिती घेऊन त्यांनी टिंग्या याला रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोठ्या शिताफीने जेरबंद केले. 

उपनिरीक्षक सोळंके यांच्यासह हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे, पोलिस नाईक अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, शैलेश गोमसाळे, कॉन्स्टेबल मोहिते, सचिन जगताप, धिरज खंडागळे, त्रिभुवन व मोबाईल सेल शाखेचे प्रशांत राठोड यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post