नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

 मलिक यांची प्रतिक्रिया...झुकेंगे नहीं लडेंगे और जितेंगे


। मुंबई । दि.23 फेब्रुवारी । राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक  यांची आज ( बुधवारी ) सकाळपासूनच ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. अखेर त्यांना आता ईडीने अटक केली आहे. आज पहाटे पाच वाजताच्या दरम्यान ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील राहत्या घरी पोहोचले. त्यानंतर मलिक यांना ईडी कार्यालयात आणण्यात आले. अखेर चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिम कासकर याचा भाऊ इकबाल कासकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. इकबाल कासकर सह इकबाल मिरची आणि अस्लम फ्रुट यांनाही ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

 त्यांच्याकडून केलेल्या चौकशीत कुर्ला परिसरातील एका जमीन खरेदीच्या व्यवहारात नवाब मलिक यांचं नाव समोर येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. इकबाल कासकर त्याच्याकडून केलेल्या चौकशीच्या आधारावर नवाब मलिक यांना ईडी च्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी कार्यालयात नेले असल्याची माहिती मिळत आहे.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर

2019 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची मोट बांधून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणले. शरद पवार यांच्या पुढाकारामुळे हा चमत्कार महाराष्ट्रात घडला खरा, मात्र आघाडीतील नेत्यांना नेहमीच केंद्रीय तपास यंत्रणांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या नवाब मलिक ईडीच्या रडारवर आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post