गॅसच्या किमती येत्या काळात वाढणार असल्याची शक्यता !

। मुंबई । दि.23 फेब्रुवारी ।  घरगुती वापराच्या गॅसच्या किमती येत्या काळात वाढणार असल्याची शक्यता आहे. ही वाढ थोडीथोडकी नसून दुप्पट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचसोबत विजेच्या किमतीतही वाढ होईल अशी शक्यता आहे.

जगभरात इंधन गॅसचा तुटवडा होत असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. या परिस्थितीचे पडसाद एप्रिलपासून दिसून लागतील. सीएनजी, पीएनजी आणि विजेच्या दरांवर या तुटवड्याचा परिणाम होऊन त्यांच्या किमती भरमसाठ वाढतील असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

जवळपास दोन वर्षांनंतर कोरोनाच्या विळख्यातून जागतिक अर्थव्यवस्था सावरू लागली आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या उर्जा इंधनांची मागणी वाढू लागली आहे. 2021मध्ये अशा इंधनांचा पुरवठा वाढवण्याच्या दृष्टीने काहीही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला आहे. त्यामुळे एप्रिलपासून गॅसच्या किमतीत बदल होऊ शकतो.

सर्वसाधारणपणे दर वर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैसर्गिक इंधन गॅसच्या किमती निश्चित केल्या जातात. एप्रिल महिन्यात जारी केल्या जाणाऱ्या किमती या जानेवारी ते डिसेंबर 2021 च्या आंतरराष्ट्रीय किमतींवर आधारित असतात. काही तज्ज्ञांच्या मतानुसार, सीएनजी गॅसची किंमत प्रतिकिलो 15 रुपये इतकी वाढू शकते.

Post a Comment

Previous Post Next Post