। अहमदनगर । दि.23 फेब्रुवारी । घराच्या बांधकामाचे पैसे मागितल्याच्या कारणातून जातीवाचक शिवीगाळ करीत लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगरमध्ये 16 फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द अॅट्रॉसिटी तसेच शिवीगाळ, मारहाण, दमदाटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मी शाहुराव आरोळे (वय 59 रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीमध्ये अशोक शामराव मुंगसे, तुषार अशोक मुंगसे, विकास अशोक मुंगसे (सर्व रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांचा समावेश आहे. फिर्यादी आरोळे यांचा मुलगा सचिन याने मुंगसे यांच्या घराचे बांधकाम करण्याचे काम घेतले होते.
या कामाचे राहिलेले पैसे सचिन याने मुंगसे यांच्याकडे मागितले. त्याचा राग आल्याने तुषार मुंगसे याने लक्ष्मी आरोळे यांच्या घरी जाऊन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तुम्ही येथे कसे राहता पाहतोच, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करीत लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तोफखाना पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करणार्या तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास नगर शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे करीत आहेत.