। अहमदनगर । दि.12 फेब्रुवारी । नगर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकार्यांचा १४ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत राज्य दौरा होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात ते सोमवारी (१४ फेब्रुवारी) भेट देणार आहेत. या दौऱ्यात महासंघाचे संस्थापक तथा मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस इंजिनिअर विनायक लहाडे, उपाध्यक्ष बाळासाहेब घोरपडे, मुंबई उपाध्यक्ष विष्णू पाटील, सहसचिव सुदाम टाव्हरे आदी पदाधिकारी सहभागी असणार आहेत.
या दौऱ्यात ते जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, डीडीआर कार्यालय, पाटबंधारे, बांधकाम, कृषी, आरोग्य, जीएसटी इत्यादी कार्यालयांना भेटी देणार असून, अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रश्नांवर चर्चा विनिमय करणार आहेत. सेवानिवृत्तीचे वय ६० करणे, जुनी पेन्शन योजना, वेतनत्रुटी बाबतचा खंड २ चा प्रलंबित अहवाल, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी,
प्रलंबित महागाई भत्ता, ई-प्रिमियमचा भरणा, राज्य कर्मचार्यांच्या संपास पाठिंबा देणे, पगरात भागवा अभियान इत्यादी प्रश्नांसोबत अधिकारी कल्याण केंद्राच्या इमारतीची बांधकाम प्रगती, अहमदनगर जिल्हा समन्वय समिती व अधिकारी दुर्गा महिला मंचच्या जिल्हा कार्यकारिणीचे पुनर्गठन आदि विषयांवर चर्चा-विनिमय करुन निर्णय घेणार आहेत.
या दौऱ्यात जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकारी यांनी सहभागी होण्यासाठीचे आवाहन जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित, उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, दुर्गा मंचच्या अध्यक्ष तथा जिल्हा कोषागर अधिकारी भाग्यश्री भोसले-जाधव व राज्य पत्रित अधिकारी महासंघाचे राज्याचे संघटन सचिव विठ्ठलराव गुंजाळ यांनी केले आहे.