। अहमदनगर । दि.09 फेब्रुवारी। जिल्ह्यातील राहुरी येथून नगर शहराकडे एसटी बसने प्रवास करत असताना बसमध्ये दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिप्ती भास्कर लांडे (वय 21, रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी लांडे यांचे दोन लाख 13 हजार रूपयांचे दागिने बसमधून चोरीला गेले. फिर्यादी दीप्ती लांडे या बहिणीच्या लग्नासाठी नगर शहरातून राहुरी येथे गेल्या होत्या.
लग्नानंतर सोमवार दि. 7 फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्या त्यांच्या जावेसोबत नगरकडे एसटी बसने येत होत्या. लांडे यांनी त्यांचे दागिने एका डब्यात ठेवून तो डबा पिशवीत एसटी बसच्या सीटखाली ठेवला होता. शहरातील सावेडी नाका येथे उतरत असताना त्यांना डबा मिळून आला नाही.
फिर्यादी लांडे यांच्या शेजारील सीटवर तीन अनोळखी महिला बसल्या होत्या. बसमधून त्या महिला एमआयडीसी येथील सह्याद्री चौकात उतरल्या होत्या. त्याच महिलांनी दागिने चोरले असल्याचे फिर्यादी लांडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके या प्रकरणाचा तपास करत आहेत.