एकलहरे प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र येथे भेट
। नाशिक । दि.20 फेब्रुवारी । ऊर्जा क्षेत्रात येणारे नवनवीन तंत्रज्ञान व माहिती, महावितरण कंपनी समोरील आव्हाने व उपाय तसेच तत्पर ग्राहक सेवा या संबधीचे उत्कृष्ठ दर्जाचे प्रशिक्षण व ज्ञान महावितरणमधील अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांना देऊन त्यांचे कौशल्य व दृष्टिकोन विकसित करून त्यांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) डॉ. नरेश गिते यांनी केले.
महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे येथे गुरुवारी डॉ. नरेश गिते यांनी भेट देऊन पाहणी केली व संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ऊर्जा क्षेत्रात ननवीन बदल व संशोधन होत असून या बदलाची व संशोधनाची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना देऊन काळानुरूप बदल घडविणे तसेच कंपनीमध्ये नवीन रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थीना कंपनीच्या ध्येय आणि धोरण याची माहिती देऊन त्यांना ग्राहक सेवेसाठी सर्वार्थाने सक्षम बनविणे अत्यंत गरजेचे आहे, असे संचालक (मासं) डॉ. गिते सूचित केलॆ.
यावेळी नव्याने विकसित केलेले सर्किट ब्रेकर सिम्युलेटर मॉडेलचे उदघाटन डॉ. नरेश गिते यांनी केले. त्यामुळे प्रशिक्षणार्थीकडून ग्राहकाभिमुख सेवा देणे सुलभ होऊन वितरण प्रणालीमध्ये 'विना अपघात महावितरण' या ध्येयाकडे यशस्वीरीत्या वाटचाल करण्यासाठी निश्चितच या प्रणालीचा उपयोग होणार असल्याचे सांगितले .
प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र येथे असलेली माहिती तंत्रज्ञान व सुविधा, ग्रंथालय, विविध प्रकारच्या प्रयोगशाळा, अद्यावत असलेले सिम्युलेटर, नवीन तंत्रज्ञानाचे वीज मीटर, सुरक्षा साधने, संशोधन पत्रिका, अंतर्गत गुणवत्ता या तंत्रज्ञानाबाबत त्यांनी माहिती घेतली.
भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयाशी संलग्न असलेलया केंद्रीय विद्युत प्राधिकरण यांनी या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्रास प्रथम श्रेणीच्या दर्जाचे नामांकन केलेले असून हे प्रशिक्षण केंद्र आय.एस.ओ.-२००९:२०१५ नुसार प्रमाणित असल्याची माहिती यावेळी मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर यांनी दिली.
तसेच विविध अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्याशी झालेल्या तंत्रज्ञ विकास संयुक्त सहयोग सामंजस्य करारानुसार तंत्रज्ञान व माहिती देवाणघेवाण, विविध कार्यशाळेचे आयोजन, संशोधन पत्रिका, विविध विषयात अधिव्याख्याता या संपूर्ण कार्यप्रणालीची माहिती तसेच महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांचे ज्ञानवाढीकरिता व त्यांना आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्नरत राहील अशी ग्वाही मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर यांनी दिली. या भेटी दरम्यान प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे येथील अभियंते अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन नियोजन केले.