। अहमदनगर । दि.20 फेब्रुवारी । पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे तरसाची शिकार करून त्याला भाजून त्याची मेजवानी करण्याच्या तयारीत असलेल्या एकास अटक करण्यात आली असून, त्याचा एक साथीदार पसार झाला आहे. याचा शोध सुरू आहे. पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे तरस प्रजातीच्या वन्यजीवाची शिकार करून त्याला भाजून खाण्याचा प्रकार उघडकीस आला असून वनविभागाने कारवाई करून या तरसाचे भाजलेले मांस, कातडी व पाय जप्त करून एकास अटक केली आहे.
परंतु त्याचा साथीदार फरार असल्याची माहिती मिळाली. याबाबत वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कान्हूर पठार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यानजीक असणार्या वस्तीवर तरस जातीचा प्राणी भाजण्यात आला असून
त्याला खाण्याची तयारी सुरू असल्याची खबर वनविभागाला मिळाल्यानंतर या ठिकाणी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी परिक्षेत्राचे सी. ए. रोडे व संदीप भोसले यांनी आपल्या कर्मचार्यांसह छापा टाकला असता त्यांना त्या ठिकाणी तरस जातीच्या वन्यजीवांचे जळालेले शरीर व कातडी आढळून आली.
त्यांनी या मृत तरसाच्या अवयवांचा पंचनामा करून फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय ओव्हळ यांनी दिली. वनविभागाने याप्रकरणी कान्हूर पठार येथील सुरेश दत्तू शिंदे यास अटक केली आहे त्यास पारनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 23 तारखेपर्यंत सहा दिवसांची वनविभागाची कोठडी दिली आहे.