। अहमदनगर । दि.13 जानेवारी । अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने कोरोना लॉकडाऊनला विरोध केला आहे. कोरोना ही न संपणारी प्रक्रिया असून, यामुळे निर्बंधांपर्यंत ठीक असून, यापुढे लॉकडाऊन नको. कोरोनाच्या भीतीने पुन्हा लॉकडाऊन केल्यास सर्वसामान्यांनी जगायचे की मरायचे? असा प्रश्न अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकार्यांना ई-मेलद्वारे पाठवलेल्या पत्रात विचारला आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाबरोबर जगावे लागणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन न करण्याची मागणी केली आहे.
प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असून, तो त्याप्रमाणे काळजी घेत आहे. त्याला लॉकडाऊन करुन कोरोनाआधी उपाशी मारु नका. अनेक कुटुंबाचे हातावर पोट असून, घरात एक व्यक्ती कमावता आहे. त्याच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी आहे. एका व्यक्तीचा रोजगार बंद झाला तर संपूर्ण कुटुंब उपाशी मरणार आहे. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास सर्वसामान्य नागरिक उपासमारीने आत्महत्या करतील. याबाबत गांभीर्याने विचार करावा, अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील. दाखल होणार्या गुन्ह्यांना सुद्धा घाबरणार नाहीत.
घरात उपाशी राहण्यापेक्षा जेलमध्ये किमान दोन वेळचे जेवण तरी मिळेल, असे रोडे यांनी पत्रात म्हटले आहे. कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे. आज निगेटिव्ह आलेली व्यक्ती उद्या पॉझिटिव्ह येऊ शकते. मग आयुष्यभर लॉकडाऊन करायचे का?, डब्ल्यूएचओने सुद्धा कोरोना बरोबर जगावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मागे झालेल्या लॉकडाऊनमुळे अद्यापि सर्वसामान्यांची अर्थव्यवस्था रुळावर येऊ शकलेली नाही. सर्वसामान्यांची आर्थिक सोय करुन लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, असेही त्यांनी यात स्पष्ट केले आहे. दरम्यान, लॉकडाऊन करा म्हणणारे सरकारी कर्मचारी आहे. सर्वात अगोदर यांचा पगार बंद करा, म्हणजे त्यांना समजेल लॉकडाऊन काय असते. घरात बसून पगार घेणार्यांना पगार पाहिजे, मात्र काम नको असल्याने ते लॉकडाऊनची मागणी करत असल्याचा आरोप रोडे यांनी पत्राद्वारे केला आहे.
Tags:
Ahmednagar