। अहमदनगर । दि.13 जानेवारी । भरधाव वेगात जाणार्या मालट्रकने रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात चुकीच्या दिशेने जात समोरुन आलेल्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नगर-सोलापूर महामार्गावर रुईछत्तीशी गावच्या शिवारात घडली.
योगेश मच्छिंद्र मुरुमकर (वय 30, रा.कोयाळ, ता.आष्टी, जि. बीड) असे मृताचे नाव आहे. याबाबत अंबादास अंकुश मुरुमकर (रा.कोयाळ ता.आष्टी) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
योगेश मुरुमकर हा हिरो होंडा पॅशन प्रो मोटारसायकलने (क्र. एम.एच.16, ए.क्यू.4995) बनपिंप्री येथून कोयाळ (ता.आष्टी) येथे नगर-सोलापूर रोडवरुन घराकडे येत असताना रुईछत्तीशी गावच्या शिवारात जानाई वस्ती जवळ नगरहून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात चाललेल्या मालट्रकने (क्र. टी. एन. 14, ए.एक्स. 3150) महामार्गावर पडलेला खड्डा चुकविण्याच्या नादात
राँग साईडला जावून समोरुन येणार्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत मोटारसायकलस्वार योगेश मुरुमकर हा जागीच ठार झाला. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार गांगर्डे करीत आहे