नेवासा तालुक्यात तीन एकर ऊस शॉर्टसर्किटने जळाला

। अहमदनगर । दि.11 जानेवारी । दिघी शिवारात विजेच्या शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत तीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. त्यामुळे या शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील दिघी शिवारात सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल कोंडिराम कर्डक यांची गट नं. 261मध्ये शेती आहे. तेथे त्यांचा तीन एकर तोडणीसाठी आलेला ऊस उभा होता. उसाला पाणी देण्याचे काम सुरू होते. 

दुपारी साडेबाराचे दरम्यान अचानक विजेचे शॉर्टसर्कीट होऊन उसाच्या शेताला आग लागली. या आगीने अचानक रौद्ररूप धारण केले. आसपास काम करणारे शेतकरी धावून आले. मात्र आगीचे लोळ पाहून त्यांना काहीच करता आले नाही.

घटनास्थळावरील शेतकर्‍यांनी अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर ही आग आटोक्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांचे आणखी नुकसान टळले. ही आग जवळच असलेल्या विजेच्या तारेच्या घर्षणामुळे झाली की शेतात सुरू असलेल्या कूपनलिकेच्या वायरच्या स्पार्किंगमुळे झाली, याबाबत कोणालाही माहिती नाही. मात्र, या आगीत तीन एकर ऊस जळून नुकसान झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post