। अहमदनगर । दि.11 जानेवारी । पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत तात्पुरती नोकर भरती करण्यात आली असून त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे व संचालकांच्या त्याच नातेवाईकांना पुन्हा सेवेत घेतले गेल्याचा दावा केला जात आहे.
यामुळे सहकार खात्याच्या संचालक नातेवाईक नोकरबंदीच्या आदेशाला हरताळ फासला असून मुदतवाढ मिळालेल्या संचालक मंडळाला सहकार खात्याने हटवून प्रशासक लावावा, अशी मागणी संचालक सुदाम कोथिंबिरे, कॅप्टन विठ्ठल वराळ, बाळासाहेब नरसाळे, संपत शिरसाठ, मारुती पोटघन, विनायक गोस्वामी,विक्रमसिंह कळमकर यांनी सहकार आयुक्तांना पत्राने केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे व संजय तरटे, कॅप्टन नामदेव काळे, शिवाजी सुकाळे, बबनराव सालके व इतर काही संचालकांनी आपल्या नातेवाईकांना बँकेच्या सेवेत घेतले आहे. 2020 साली झालेल्या कर्मचारी भरतीत अर्थपूर्ण व्यवहार झालेले होते.
त्यामुळे ही नोकर भरती रद्द करावी लागली होती. आता त्याच नातेवाईकांना पुन्हा सेवेत घेतले असल्याने या भरतीमुळे बँकेवर आर्थिक बोजा वाढणार आहे. आपल्याच घरातील आप्तस्वकीयांना मागील दाराने संधी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रकार सैनिक बँकेत घडला आहे. त्यामुळे सहकार खात्याच्या परिपत्रकाचे उल्लंघन झाले असून गैरव्यवहारी संचालक मंडळ बरखास्त करावे व या भरतीस स्थगिती द्यावी, अशी मागणी यात केली आहे.
Tags:
Breaking