तब्बल 48 वर्षानंतर घडली शालेय मित्रांची भेट
बॉईज हायस्कूलच्या1974 च्या मॅट्रिक बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात
शालेय जीवनाच्या आठवणीने माजी विद्यार्थी भारावले
। अहमदनगर । दि.18 जानेवारी । सोशल मीडियाने जग जोडले जात असताना, तब्बल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर माजी विद्यार्थी एकत्र आले. मराठी मिशनच्या अहमदनगर बॉईज हायस्कूलचे सन 1974 च्या मॅट्रिकच्या (इयत्ता अकरावी) बॅचचे विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपने जोडले जाऊन त्यांचा स्नेह मेळावा बॉईज हायस्कूलच्या मैदानात उत्साहात पार पडला. तब्बल 48 वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र आलेल्या शालेय जीवनातील जुन्या मित्रांना ओळखणेही अवघड झाले होते. या जुन्या सवंगडींनी एकत्र येत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
हे देखील वाचा...नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर ; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.43 टक्के
एकत्र आलेल्या सन 1974 च्या मॅट्रिकच्या (इयत्ता अकरावी) बॅचच्या विद्यार्थ्यांनी बॉईज हायस्कूलला भेट दिली. या स्नेह मेळाव्यास प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका अनिता सुर्यवंशी उपस्थित होत्या. यावेळी नंदकिशोर परदेशी, जफर खान, हिरालाल चंगेडे, विनीत मकासरे, विजय सत्रालकर, फारुक शेख यांनी आपल्या भावना व्यक्त करुन जुन्या आठवणी सांगितल्या. या स्नेह मेळाव्यासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून माजी विद्यार्थी आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी एकत्र आले होते.
हे देखील वाचा...सोयाबीनची परस्पर विल्हेवाट लावून 13 लाखाला फसवले
एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेल्या काही माजी विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप सुरु केला. बघता-बघता अनेक विद्यार्थी या ग्रुपमध्ये जोडले गेले. तब्बल 48 वर्षानंतर या स्नेह मेळाव्यातून सर्व माजी विद्यार्थी एकवटले. आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळावा व धावपळीच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेची शिस्त व झालेल्या शैक्षणिक संस्कारामुळे विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त करुन शाळेचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल औटी यांनी केले. आभार विजय सत्रालकर यांनी मानले.