पै.छबुराव लांडगे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त अभिवादन
। अहमदनगर । दि.28 फेब्रुवारी । पै.छबुराव लांडगे यांनी कुस्ती क्षेत्राचा वारसा जोपासत नगर शहराचं नाव देशपातळीवर पोहचविण्याचे काम केले. कुस्तीक्षेत्रामध्ये नामवंत पैलवान गामा यांना चितपट करुन हिंदुस्थानमध्ये दख्खनचा काला चित्ता या मानाच्या किताबाने बहुमान मिळविला.
देशामधील कुस्तीची विविध मैदाने त्यांनी गाजविली. आजच्या युवा पैलवानांनी त्यांचा आदर्श घेऊन आपली वाटचाल करावी. तसेच अनेक विविध मल्ल घडविण्याचे काम त्यांनी केले. मी व काका कुस्तीचे डावपेच शिकण्यासाठी सर्जेपुरा येथील तालमीत जात होतो. त्यांनी कुस्तीक्षेत्रा बरोबरच राजकारणतही कामाच्या माध्यमातून आपला ठसा उमटविला होता. त्यांनी नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून शहराची सेवा केली, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
कै.पै.छबुराव लांडगे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आ. संग्राम जगताप. समवेत पै.अनिल गुंजाळ, पै.अतुल कावळे, पै. सनी विधाते, पै.राहुल गाढवे, पै.वैभव वाघ, पै.ओंकार घोलप, पै.राजु शिंदे, अभिजित खोसे, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, मळू गाडळकर, विजय सुंबे, अयाज सय्यद, हर्षल शिरसाठे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पै.अनिल गुंजाळ म्हणाले की, कुस्ती क्षेत्रातील धडे पै.छबुराव लांडगेंकडून आम्हाला मिळाले, हे आम्ही आमचे भाग्यच समजतो. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी असे मल्ल घडलेले आहेत. त्यांनी कुस्तीक्षेत्रात केलेल्या योगदानाचा अनेक मल्लांना मोलाचा व कायम उपयुक्त असा राहणार आहे, असे ते म्हणाले.