सोयाबीनची परस्पर विल्हेवाट लावून 13 लाखाला फसवले


अहमदनगर । दि.18 जानेवारी । ट्रकचालक व मालकाने ट्रकमधील सोयाबीनची परस्पर विक्री करून एका व्यापार्‍याला चक्क 13 लाखाला फसवल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे.

सुमित अनिल गुंदेचा यांची माळीचिंचोरा फाटा येथे आडत आहे. दोन दिवसांपूर्वी गुरुदत्त ट्रान्सपोर्ट अहमदनगर यांचे मालक पोपट रामभाऊ कोलते (रा.अ.नगर) यांच्या मालट्रकमध्ये (एमएच 18 बीजी 6994) 22 टन 470 किलो वजनाच्या सोयाबीनच्या 426 बॅगा किंमत 14 लाख 88 हजार 667 रुपये असलेल्या भरुन हा मालट्रक दिशान अ‍ॅग्रो.-धुळे येथे रवाना केला. 

तेव्हा ट्रकमध्ये चालक प्रसाद संतोष कराडे, ज्ञानेश्वर संतोष कराडे व ट्रकमालक संतोष बारकू कराडे हे होते. 9 जानेवारीला सोयाबीन बॅगा पोहचल्या की नाही याबाबत मालट्रकच्या मालकाकडे फोनवरुन चौकशी केली असता माल पोहचला नाही. ट्रक दुरुस्तीचे काम मनमाड येथे चालू असल्याचे सांगण्यात आले. 10 तारखेला ट्रकमालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. 

तेव्हा ट्रान्सपोर्टचे मालक पोपट कोलते यांना घेऊन ते मनमाड येथे ट्रकमालक संतोष कराडे याच्या घरी गेले, तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्यांनी ट्रकचा शोध सुरू केला. 11 जानेवारी रोजी मालट्रक मनमाड शिवारात चालक ज्ञानेश्वर कराडेसह मिळून आला.

ट्रकमध्ये केवळ सोयाबीनच्या 30 बॅगा शिल्लक राहिलेल्या होत्या व उर्वरीत सुमारे 20 टन वजनाच्या 13 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या 396 सोयाबीन बॅगांची त्यांनी परस्पर विल्हेवाट लावली असल्याची खात्री झाली. यावरुन नेवासा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी मनमाड येथून चार आरोपींना अटक केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post