मनसे नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा!
कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तासमीकरणाला वेग
| मुंबई | दि.21 जानेवारी 2026 | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत अनपेक्षित वळण लागले असून,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. या घडामोडींमुळे महापालिकेवर महायुतीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महापालिकेतील बहुमताचा आकडा 62 असून, तो गाठण्यासाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींनी आता निर्णायक टप्पा गाठला आहे.
शिंदे गटाकडे आधीच लक्षणीय संख्याबळ असताना, मनसेच्या पाठिंब्यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक बहुमत अधिक सुलभ झाले आहे. याआधी मंगळवारीरात्री शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसेचे नेते राजू पाटील यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत सत्तास्थापनेच्या शक्यता आणि महापौर पदासंदर्भातील चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर कोकण भवन येथे दोन्ही पक्षांचे नेते एकत्र दिसल्याने राजकीय चर्चांना वेग आला.
संख्याबळाचे गणित
सध्या शिंदे गटाकडे 53, मनसेकडे 5, तर ठाकरे गटाकडे 11 नगरसेवक आहेत. काही नगरसेवक गैरहजर राहिल्याने ठाकरे गटाचे संख्याबळ घटले आहे. मनसेचे 5 आणि ठाकरे गटातून बाहेर पडलेले काही नगरसेवक शिंदे गटाच्या बाजूने गेल्याने बहुमताचा आकडा जवळपास गाठला गेला आहे.
