। अहमदनगर । दि.08 जानेवारी । श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे जिलेटिनच्या काड्याचे स्फोटके व डेटोनेटर चे बॉक्स नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. श्रीगोंदा तालुक्यात अवैध धंदे सर्रासपणे दिवसाढवळ्या सुरू आहेत. वाळू तस्करी, डिझेल तस्करी, बनावट दुध, जुगार, मटका बनावट दारुसह अवैध धंद्यांवर कारवाई होत नाही. एलसीबीच्या पथकाने कारवाई करत श्रीगोंदा पोलीसांचा पोलखोल केल्याचे दिसून येते.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घारगाव शिवारामध्ये जिलेटिनच्या काड्या व डेटोनेटर विनापरवाना व बेकायदेशीर रित्या वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील बबन मखरे, शिवाजी ढाकणे, शंकर चौधरी, संभाजी कोतकर, योगेश सातपुते या कर्मचार्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे सापळा लावून घोगरगाव शिवारातील रुईखेल गावात जाणार्या रोडवरती तरटे वस्तीजवळ पथकाने होंडा एच एफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक चक 16 इए 5186 येताना दिसली. मोटरसायकलवारास देवेंद्र प्रल्हादचंद शर्मा वय 30 राहणार बाडी ता विजयनगर जि. अजमेर (राजस्थान) हल्ली रा. भानगाव ता श्रीगोंदा ताब्यात घेतले.
मोटरसायकलवर एका पांढर्या गोणीमध्ये व डीक्कीत एक 39650 रु. मुद्देमालामध्ये जिलेटिन व डीटोनेटर अशा वस्तू मिळून आल्या वरील प्रमाणे जिलेटिन काड्या व लेटर बॉक्स ताब्यात घेतले. आरोपींच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन विठ्ठल मखरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवेंद्र प्रल्हादचंद शर्मा याच्या विरुद्ध भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 चे कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके ,पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन मखरे,पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी कोतकर,पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे,पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते यांच्या पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव परिसरामध्ये ही कारवाई केली आहे.