। अहमदनगर । दि.08 जानेवारी । ओळखीचा फायदा घेत भरदिवसा घरात घुसून ५५ हजार रुपयांची रोकड एका महिलेने पळविल्याची घटना बालिकाश्रम रोडवरील बागडेमळा परिसरात दुपारी २.३० च्या सुमारास घडली.
याबाबत राधा मिलिंद कुलकर्णी (रा.आश्रय बंगला, बागडेमळा, बालिकाश्रम रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुलकर्णी या त्यांच्या सुनेसमवेत सर्जेपूरा येथे खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी त्यांच्या ओळखीची कायनेटिक चौक येथील आव्हाड विट भट्टीजवळ राहणारी महिला श्वेता थापा उर्फ निमसे हिने कुलकर्णी यांच्या घरी जावून घराच्या दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला.
तसेच घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरुममध्ये जावून कपाटातील ५५ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. कुलकर्णी या घरी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली.
या फिर्यादीवरुन पोलिसांनी संशयीत आरोपी श्वेता थापा हिच्या विरुद्ध भा.दं.वि.क. ४५४, ३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार वाघमारे करीत आहे.