। अहमदनगर । दि.09 जानेवारी । नगर तालुक्यातील नेप्ती शिवारातील दोन गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तयार दारू व दारू बनवण्याचे रसायन आणि साहित्य असा सुमारे 58 हजार रुपये किमतीचा माल नष्ट केला.
याबाबतची अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी या कामी स्वतंत्र पथक स्थापन करून पथकाला कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.
त्यानुसार पथकातील पोलिस अंमलदार यांनी नगर तालुक्यामध्ये कारवाईची विशेष मोहीम राबवून नेप्तीत दोन ठिकाणी छापे टाकून एकूण 58 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन दोघांविरुध्द नगर तालुका पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिासांनी कानिफनाथ भिमाजी कळमकर याच्या ताब्यातील 33 हजार रुपये किंमतीची तयार दारु व 600 लिटर गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन जप्त केले व राजू छबु पवार याच्या ताब्यातील 25 हजार रुपये किमतीची तयार दारु व 400 लिटर कच्चे रसायन नष्ट केले.