। अहमदनगर । दि.07 जानेवारी । श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी सौ. उमा राहुल तारखंडे हिला सासरच्या लोकांनी, तू पुणे येथे पतीला घर घेण्यासाठी 5 लाख रुपये घेवून ये, अशी मागणी करून तिचा वेळोवेळी पैसे आणावे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासातून उमा आजारी पडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी उमाचे वडील आनंदा माहोर (रा. सिल्लोड) यांनी श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिल्याने पोलिसांनी राहुल सुरेश तारखंडे (पती), सावित्री सुरेश तारखंडे (सासू), भरत सुरेश तारखंडे(भाया), जयाबाई भरत तारखंडे (जाव, सर्व रा. पढेगाव, श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक बोरसे पुढील तपास करीत आहेत.