। अहमदनगर । दि.07 जानेवारी । संगमनेर तालुक्यातील मांडवे बु.चौघुले वस्ती परिसरात राहणारी एक विवाहित तरुणी तिच्या घरात एकटी असताना सलीम चांदखान पठाण (रा.चौघुले वस्ती, मांडवे बु., ता.संगमनेर) हा अनाधिकाराने घरात घुसला. तिच्याशी अश्लिल बोलून व तिला धरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला.
विवाहितेने आरडाओरड करताच, तू जर झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या मुलीला जीवे ठार मारुन टाकील, अशी धमकी देवून शिवीगाळ केली व निघून गेला. हा प्रकार सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
या प्रकरणी घारगाव पोलिसांनी पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन सलीम पठाण याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास घारगाव पोलिस करीत आहे.