। सातारा । दि.25 नोव्हेंबर । आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्हा बँकेची निवडणूक गांभीर्याने घेतली नाही. सातारा जिल्हा बँकेची निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली नव्हती. मी अद्याप त्यांच्या पराभवाचे कारण काय असू शकेल याच्या खोलात गेलेलो नाही. पण शशिकांत शिंदे यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी, होती असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले आहे.
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनावर दगडफेक झाली. ही घटना खूपच दुर्दैवी आहे. काही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे कृत्य केले. परंतु, ज्यांच्यासाठी हे कृत्य केले, त्यांनी स्वतः या प्रकारासाठी दिलगिरी व्यक्त केली असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
महाबळेश्वरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. नुकत्याच लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते.