चारचाकी वाहन आडवून जबरी चोरी करणारा जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
। अहमदनगर । दि.17 नोव्हेंबर । पाथर्डी तालुक्यातील खरवंडी ते पाथर्डी प्रवासात चारचाकी वाहने आडवून जबरी चोरी करणारा आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. नितीन सुभाष खिलारे (वय 26 वर्षे, रा. बांदरवडा, ता. पाथरी जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याला लोणीकंद, पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली डिस्कव्हरही जप्त करण्यात आली आहे.
दत्तात्रय दगडू नलावडे (वय 39 धंदा. वाहन चालक रा. सविदने ता. शिरुर जि . पुणे याना खरवंडी शिवारात टेम्पो चालविताना समोरुन बजाज डिस्कव्हर गाडीवर एक अनोळखी इसम येऊन शिवीगाळ व त्यांच्याकडील टेम्पो जाळण्याची धमकी देत 44 हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. त्याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक मनोज पटील यांनी सदर गुन्ह्याचा तातडीने तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्ह्यांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा नितीन सुभाष खिलारे याने केला असून तो सध्या लोणीकंद ता.हवेली जि . पुणे येथे आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, विेशास बेरड, पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, रोहीत येमुल, मच्छिंद्र बर्डे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे अशांनी मिळून लोणीकंद ता. हवेली जि. पुणे येथे जावुन सदर गुन्हयातील
आरोपी नामे नितीन सुभाष खिलारे वय 26 रा . बांदरवडा ता.पाथरी जि . बुलढाणा यांस शिताफीने ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याबाबत विेशासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हयात वापरलेली बजाज कंपनीची डिस्कव्हर गाडी (क्र. एम. एच. 12 जे. डब्लू. 6441 ही गाडी गुन्ह्यात वापरल्याचे सांगितले.