। अहमदनगर । दि.17 नोव्हेंबर । श्रीगोंदा येथील काष्टीत सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याचे पुन्हा एकदा पाहावयास मिळाल आहेे. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टीत सख्ख्या भावावर गोळीबार केल्याची थरारक घटना घडली आहे. दोघा भावांमध्ये किरकोळ कारणावरून हमरीतुमरी होऊन त्याचे पर्यावसन गोळीबारात झाले. गोळीबाराच्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
यामध्ये सख्या भावाने दोन गोळ्या सख्या भावावरच झाडल्या आहेत. यामध्ये एका भावाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
माहिती अशी की, डॉ.विजय देवीचंद मुनोत आणि मनोज देविचंद मुनोत या दोन भावांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.
डॉ.विजय मुनोत यांनी मनोज मुनोत यांच्यावर रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या झाडल्या असून एक गोळी मांडीला तर दुसरी गोळी पोटाला लागली आहे. या गोळीबाराने मनोज मुनोत यांची प्रकृती खालावली असून, त्यांना उपचारासाठी दौंड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर पुणे येथे उपचारासाठी हलवल्याचे सांगण्यात येत आहे. काष्टी येथे विजय मुनोत यांचा वैद्यकीय व्यवसाय आहे तर मनोज मुनोत यांचा भुसार किराणा माल विक्रीचा व्यवसाय आहे. दोन्ही भावांचे व्यवसाय हे समोरासमोर आहे.
डॉ.विजय मुनोत यांचे हॉस्पीटल तर मनोज मुनोत यांचा किराणा विक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान मनोज मुनोत यांच्या दुकानात विक्रीचे साहित्य घेऊन एक टेम्पो आला होता. टेम्पो चालकाने सदर टेम्पो डॉ.मुनोत यांच्या हॉस्पिटलसमोर उभा केला होता.
टेम्पो माझ्या दवाखान्यासमोर का उभा केला? म्हणून डॉ. विजय मुनोत यांनी मनोज मुनोत यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही भावांमध्ये झटापट झाली. याचवेळी मनोज मुनोत यांनी डॉ. विजय मुनोत यांच्या डोक्याला मारहाण केल्याने ते जखमी झाले.
डॉ.विजय मुनोत यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने मनोज मुनोत यांच्यावर गोळीबार केला. डॉ.विजय मुनोत यांनी रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या मनोज मुनोत यांच्यावर झाडल्या असून एक गोळी मांडीला तर दुसरी गोळी पोटाला लागली आहे. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी धाव घेतली.
जखमी डॉ. विजय मुनोत यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. मनोज मुनोत यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. ज्या रिव्हॉल्वरमधून गोळीबार करण्यात आला. ते जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.
गोळीबाराच्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काही वेळातच घटनास्थळी पोलीस अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.