। अहमदनगर । दि.15 नोव्हेंबर । नगर तालुक्यातील नांदगाव शिवारात मोटारसायकलवरून जाणार्या दोघांना तिघाजणांनी मोटारसायकल आडवी घातली व एकास लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. त्यांच्याकडील पन्नास हजार रुपये रोख तसेच मेंढ्यांचे केस कापण्याचे मशीन असा ऐवज चोरून नेला.
याबाबतची माहिती अशी की कृष्णा भाऊसाहेब सरक (वय 26, राहणार कोळपे आखाडा, नांदगाव शिवार, ता. नगर) हा त्याचा मावसभाऊ गोरख कोळपे (राहणार बिरोबा मंदिराजवळ, नांदगाव, तालुका नगर) याच्यासह मोटारसायकलवरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी
त्यांना मोटारसायकल आडवी घालून थांबवले व गोरख कोळपे याला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले आणि कृष्णा सरक यांच्या खिशातील पन्नास हजार रुपये व मेंढ्यांचे केस कापण्याचे मशीन बळजबरीने चोरून नेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जाधोर करीत आहे.