सावेडी उपनगरात तरुणाची आत्महत्या


। अहमदनगर । दि.25 नोव्हेंबर ।
शहरातील सावेडी परिसरात राहणार्‍या एका उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रोशन रामकृष्ण माळी (वय 29, रा. सावेडी नाका, मूळ रा. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे. माळी हे मूळचे नाशिकचे असून ते इंजिनिअर होते. तेे नगरच्या एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये नोकरी करत होते. त्यांचे 11 महिन्यापूर्वी लग्न झाले होते. 

 कंपनीचे लोक व त्याचे मित्र त्यांना सातत्याने संपर्क करत होते, मात्र ते फोन घेत नव्हते. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. त्यांना घराचे दार बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना दिल्यानंतर 

तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवले. घराचे दार उघडल्यानंतर रोशन यांचा मृतदेह याठिकाणी आढळून आला. त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.या घटनेचा पंचनामा केल्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. 

या घटनेसंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहेत. दरम्यान, रोशन हा नगरच्या क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्याचे 11 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर दुसर्‍या महिन्यापासूनच त्याच्या पत्नीने त्याला टॉर्चर करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. 

या दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाले. त्याची पत्नी जळगावची असून, ती गेल्या काही महिन्यापासून तिच्या माहेरी राहत आहे. फोनद्वारे सुद्धा त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचे टॉर्चर करण्याचे काम सुरू होते. याला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे बोलते जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post