। अहमदनगर । दि.23 ऑगस्ट । दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना राहुरी पोलिसांनी पाठलाग करुन शिताफीने पकडले. या वेळी अंधाराचा फायदा घेऊन तिघेजण पसार झाले. ही कारवाई राहुरी जुने बसस्थानक परिसरात बारागाव नांदूर फाटा येथे केली.
या कारवाईत पोलिसांनी सराईत गुन्हेगार भारत भाऊसाहेब ढोकणे (वय 28, राहणार जुने बस स्थानकाजवळ, राहुरी) व ओमकार सुनील डहाके (वय 21, राहणार कोळीवाडा, राहुरी) यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून मिरची पुड व एक लोखंडी टामी आढळून आल्याने तो मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राहुरी पोलिसांचे पथक मध्यरात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग गस्त घालीत असताना गुप्त खबर्याने माहिती दिली की, नगर मनमाड राज्य महामार्गावर शहर हद्दीत पाच दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. पोलिस पथकाने ताबडतोब जाऊन तेथे छापा टाकला. यावेळी दोघांना पाठलाग करून पकडले तर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हवालदार महेंद्र गुंजाळ व चालक लक्ष्मण बोडखे आदी पोलिसांचे पथक रात्री राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग गस्त घालीत असताना त्यांना या दरोडेखोरांची माहिती मिळाली होती. आताच तेथे गेल्यास ते मिळून येतील, असेही सांगितले गेल्याने पोलिस जुन्या बसस्थानकाजवळ गेले.
तेथे पाचजण संशयितरित्या अंधारात उभे असल्याचे दिसले व पोलिसांना पाहताच ते पळू लागले. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून दोघांना शिताफीने पकडले, परंतु तिघे पसार झाले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात पोलिस हवालदार लक्ष्मण बोडखे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत करीत आहे.
