भेसळीचे पाच हजार लिटर दूध अखेर केले नष्ट
। अहमदनगर । दि.27 ऑगस्ट । येथील राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे मंगळवारी सकाळी सातच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकत कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. केवल एखाद्या कारवाईने हे रँकेट उद्ध्वस्त होणार नाही. तर व्यापक प्रमाणावर असलेली पाळेमुळे खोदण्याची गरज व्यक्त केली जाते आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जालिंदर ठकाजी वने (रा. वनेवस्ती, घेरूमाल रोड) याच्या जनावरांच्या गोठ्यावर अचानकपणे धाड टाकली. दरम्यान तेथे भेसळीसाठी वापरण्यात येणारी पावडर व ऑईल आढळून आले.
छाप्यात सापडलेले भेसळयुक्त दूध लगेच जागेवर नष्ट करण्यात आले. भेसळीचे साहित्य व नमुने ताब्यात घेण्यात आले असून वने हा दररोज सुमारे 170 लिटर दूध डेअरीला घालत होते. प्रत्यक्षात
त्याच्या गोठ्यातून अवघे 100 लिटरपेक्षा कमी दूधाचे उत्पादन होते.
वने हा दुधात भेसळ करून दिगंबर पटारे देवी मंदिर रोड यांच्या मुक्ताई दूध संकलन केंद्र व प्रकाश शिवाजी नगरे यांच्या श्रीनिवास दूध संकलन केंद्र सोनई - शनिशिंगणापुर रोड येथे दूध घालत होता. दूध भेसळ कारणावरून पटारे यांच्या डेअरीमधील 20 हजार रुपये किंमतीचे 800 लिटर दूध नष्ट केले.
तर 10 हजार रुपये 700 रुपये किंमतीचे 4500 लिटर दूध नष्ट केले. दोन्ही डेअरीमधून दुधाचा नमुना तपासणीसाठी घेतला आहे. सदरची कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी प्रताप कुटे, शरद पवार, उमेश सुर्यवशी यांच्या पथकाने सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या उपस्थितीत केली.
दरम्यान,यापुर्वीही तालुक्यात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या
होत्या. वचक व कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे होत नसल्याने दुध भेसळ करणार्यांचे फावत चालले आहे.
