महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

। मुंबई । दि.27 ऑगस्ट । सोलापूरचे प्रसिद्ध मल्ल महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून उदयोन्मुख कुस्तीपटूंचा प्रेरणास्त्रोत आज काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी पैलवान अप्पालाल शेख यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, पैलवान अप्पालाल यांचा जन्म मल्लविद्येची मोठी परंपरा असणार्‍या दक्षिण सोलापूरच्या बोरामणी गावातील शेख कुटुंबात झाला. कुस्ती परंपरेशी एकरुप झालेल्या शेख कुटुंबातील तिघाजणांनी महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला आहे.

न्यूझीलंड येथे 1991 साली झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत अप्पालाल शेख यांनी सुवर्णपदक जिंकत देशाचे नाव उंचावले होते. पैलवान अप्पालाल शेख यांनी त्यांच्या जीवनात अनेक नामवंत मल्लांचा पराभव करत कुस्तीची मैदानं गाजवली. त्यांच्या निधनानं राज्याच्या कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र केसरी पैलवान अप्पालाल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अनेक पैलवानांना आस्मान दाखवणारे आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी होते. आप्पालाल महाराष्ट्र केसरी झाले. त्याआधी अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या आप्पालाल यांनी लढल्या. बल्गेरिया आणि इराण येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी देखील आप्पालाल यांची निवड झाली. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र 1991 साली न्युझिलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत आप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्ण पदक देखील पटकावलं. आप्पालाल यांचे पुतण्या मुन्नालाल शेख यांनी देखील 2002 साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. एकाच परिवारात तीन महाराष्ट्र केसरी गदा आहेत. अशा या मल्लाच्या जाण्याने क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post