खोट्या नॅरेटीव्हने मिळविलेला विजय फार काळ टिकणार नाही : मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री शिंदे यांनी साधला आ.किशोर दराडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ लोणीत संवाद
| अहमदनगर : लोणी | दि.23 जुन 2024 | खोट्या नॅरेटीव्हने मिळविलेला विजय हा फार काळ टिकणार नाही, उद्याचा दिवस महायुतीचा असणार आहे. आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. विधानसभेच्या निवडणूकीत पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकविणारच असा आत्मविश्वास मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ.किशोर दराडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ लोणी येथे शिक्षक मतदार, संस्था चालक आणि महायुतीचे पदाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. शिक्षकांचा आत्मसन्मान आणि मान वाढविण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी महायुतीचे सरकार निश्चित प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आ.राम शिंदे, आ.मोणिकाताई राजळे, डॉ.सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, माजी आ.वैभव पिचड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग,विठ्ठलराव लंघे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, विनायक देशमुख, सुरेंद्र थोरात यांच्यासह जिल्ह्यातील संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाचा कना शिक्षक आहे, त्यांच्याप्रती सर्वांच्या मनात आदराची भावना आहे. शिक्षकांचे आशिर्वाद आम्हाला हवे आहेत. भविष्यातील पिढी घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यामुळेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका ही महायुती सरकारची आहे. शिक्षकांचा आत्मसन्मान कसा वाढेल हाच प्रयत्न महायुती सरकारचा असून, महायुतीचे उमेदवार आ.किशोर दराडे यांनी सभागृहात मांडलेले सर्व प्रश्न सोडविण्याचे काम राज्य सरकारने केले आहे.
