प्रशासनाच्या मदतीने १३१ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर !

प्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे दुसऱ्या दिवशी ९१ पूरग्रस्तांची सुटका

पाथर्डी, शेवगांव, जामखेड व कर्जत तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती कायम

प्रशासनाच्या मदतीने १३१ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर ! 

 

। अहिल्यानगर । 24  सप्टेंबर 2025 । जिल्ह्यात २२ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळपासून २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगांव, जामखेड व कर्जत या तालुक्यांतील ओढे-नाले व नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या ९१ नागरिकांची आज रोजी महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक व शोध-बचाव पथकांच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली.

बचावकार्याची ठळक माहिती

📌 जामखेड तालुक्यातील तरडगाव येथे खैरी नदीच्या पुरामुळे दौंडाची वाडी रस्त्यावर अडकलेल्या ७ जणांची महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सुटका केली.

📌 पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव व  सोमाठाणे येथे अनुक्रमे १५ व  १० नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यात आले.

📌 शेवगांव तालुक्यातील खरडगाव येथे प्रसुती वेदना सुरू झालेल्या महिलेचा कुटुंबासह सुरक्षितपणे बाहेर काढून दवाखान्याकडे रवाना करण्यात आले.

📌 शेवगांव तालुक्यातील वरुर येथे पूरपरिस्थितीत अडकलेल्या १७ नागरिकांची एसडीआरएफ (धुळे) पथकाने यांत्रिक बोटीच्या साहाय्याने सुटका केली.

📌 कर्जत तालुक्यातील खताळ वस्ती, मलठण येथून एनडीआरएफ (पुणे) पथकाने ३८ नागरिकांची सुरक्षित सुटका केली.


अतिवृष्टी झालेली मंडळे

🎯 जिल्ह्यात एकूण ३५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाथर्डी तालुक्यात ९, शेवगांवमध्ये ८, जामखेडमध्ये ६, अहिल्यानगरमध्ये ५, कर्जतमध्ये ३, नेवासा मध्ये २, तर श्रीगोंदा व पारनेर या तालुक्यांत प्रत्येकी १ मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

नागरिकांचे स्थलांतर - 

🎯  पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या कर्जत व शेवगांव तालुक्यातील निंबोडी, तरडगाव, मलठण, सितपूर, आखेगाव व भगूर या गावांतील १३१ कुटुंबांतील सुमारे ४६५ नागरिक, १४९ जनावरे जनावरांना गावातील शाळा व नातेवाईकांकडे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.

धरणांमधून विसर्ग

🎯 २३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून 

खालीलप्रमाणे विसर्ग सुरू होता –

⛅ जायकवाडी धरणातून ८४,८८८ क्युसेक

भंडारदरा धरणातून ५,५९३ क्युसेक

मुळा धरणातून ७,००० क्युसेक

घोड धरणातून ८,००० क्युसेक

सीना धरणातून २१,०१४ क्युसेक

खैरी धरणातून ५,२३३ क्युसेक

सीना धरणाचा विसर्ग वाढल्यामुळे कर्जत तालुक्यातील निंबोडी, तरडगाव, मलठण तसेच जामखेड तालुक्यातील दिघी, फक्राबाद व चोंडी या गावांमध्ये पाणीपातळी वाढत आहे. यामुळे महसूल यंत्रणा ग्रामस्तरावर सतत कार्यरत असून आवश्यकतेनुसार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले जात आहे.

इतर घडामोडी :- 

अहिल्यानगर शहरातील कल्याण रोडवरील नवीन पुलालगतचा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करून पर्यायी मार्गांचा वापर सुरू आहे.

पाथर्डी तालुक्यात २० सप्टेंबर रोजी शिरपूर येथे वाहून गेलेल्या अतुल रावसाहेब शेलार यांचा मृतदेह आज (२३ सप्टेंबर) तिसगाव शिवारात आढळला.

सद्यस्थितीत एनडीआरएफचे पुणे पथक कर्जत तालुक्यात तर एसडीआरएफचे धुळे पथक पाथर्डी तालुक्यात तैनात असून, जिल्हा प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post