। अहिल्यानगर । दि.28 एप्रिल 2026 । कोपरगाव तालुक्यातील भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे कोपरगावसह संपूर्ण जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे यांनी काल मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. विवेक कोल्हे यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्याने जिल्हयात राजकाणाचे समिकरण बदलणार आहे.
विवेक कोल्हे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप संघटनेत सक्रिय असून युवकांमध्ये त्यांची मजबूत पकड आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवत जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या संघटन कौशल्याची आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या मजबूत नात्याची दखल घेत विधान परिषदेची उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे कोपरगाव तालुक्यात भाजपला अधिक बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

