भिस्तबागला दुचाकीस्वाराने महिलेची पर्स हिसकावली

। अहमदनगर । दि.23 ऑगस्ट । रक्षाबंधन सणासाठी राखी खरेदी करण्यासाठी दुचाकीवरुन जात असलेल्या महिलेच्या हाताची पर्स मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी चोरांनी हिसकावून चोरून नेली. ही घटना सावेडी परिसरातील पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग येथील तुळजा कॉलनी रोडवरील अर्जुन कसबे यांच्या बंगल्यासमोर घडली.

याबाबतची माहिती अशी की सीमा अनिल पाटील (वय 37, राहणार तुळजानगर, भिस्तबाग तलाठी कार्यालयामागे, पवननगर चौकाजवळ, भिस्तबाग) या त्यांच्या मुलीसह रक्षाबंधन सणासाठी राखी खरेदी करण्यासाठी दुचाकीवरुन जात असताना

पाठीमागून डाव्या बाजूने आलेल्या मोटारसायकलवरील दोन अनोळखी चोरांनी त्यांच्या हातातील पर्स त्यात अकरा हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाइल व रोख रक्कम असलेली हिसकावून बळजबरीने चोरून नेली. चोरांनी पर्स हिसकावताना हाताला झटका बसल्याने

पाटील यांचा तोल जाऊन त्या गाडीवरून खाली पडता पडता वाचल्या. त्यांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरटे मोटारसायकलवरून पसार झाले. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सीमा पाटील यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस हवालदार आंधळे करीत आहे.

शहर आणि उपनगरात सध्या चोर्‍याचा सुळसुळाट सुरु झाला असुन महिलांच्या हातातील पर्स चोरण्यापर्यंत आता चोरट्यांची मजल गेली आहे. गंठण चोर्‍या थांबल्यानंतर आता पर्स चोरणार्‍यांचे प्रमाण वाढत चालले आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता योजना कराव्यात अशी मागणी महिलावर्गातुन होत आहे.

उपनगर आणि शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत वारंवार महिलांच्या पर्स चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. याला पोलिसांनी आळा घालावा आणि चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post