वाळकीच्या दारू अड्ड्यावर छापा, 31 हजाराचा मुद्देमाल जप्त

 वाळकीच्या दारू अड्ड्यावर छापा, 31 हजाराचा मुद्देमाल जप्त


। अहमदनगर । दि.24 ऑगस्ट । विनापरवाना बेकायदा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टीची दारु, कच्चे रसायन असा माल विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना आढळून आल्याने त्या अड्ड्यावर नगर तालुका पोलिसांनी छापा घालून 31 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नगर तालुक्यातील वाळकी येथे केली.

याबाबतची माहिती अशी की नगर तालुक्यातील वाळकी येथील धोंडेवाडी तलावाच्या भिंतीच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारूचा अड्डा सुरू असून मोठ्या प्रमाणात दारू बनवून विक्री केली जाते, अशी माहिती नगर तालुका पोलिसांनी मिळाली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप यांनी दिलेल्या सूचनेवरून नगर तालुका पोलिसांनी वाळकीतील धोंडेवाडी येथील तलावाजवळ सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकला. 

पोलिसांना पाहताच दारू अड्डा मालक संतोष दिलीप पवार (राहणार धोंडेवाडी, वाळकी, तालुका नगर) हा पळून गेला. या कारवाईत चोवीस हजार रुपये किमतीची चारशे लिटर हातभट्टीची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, सात हजार रुपये किमतीची सत्तर लिटर हातभट्टी तयार दारू असा 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस हवालदार गणेश लबडे, महिला पोलिस हवालदार अमिना शेख, पोलिस हवालदार काळे, पोलिस नाईक बी. बी. कदम व योगेश ठाणगे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post