'सिव्हिल’मधील सीसीटीव्ही प्रकरणाची चौकशी करा : शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव यांची मागणी

। अहमदनगर । दि.04 जून । जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठा सीसीटीव्ही खरेदी घोटाळा झाला असून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप मुरंबीकर आणि विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा यांच्या कार्यकाळात सीसीटीव्ही खरेदी घोटाळा झाला आहे.

अवघ्या चार ते पाच लाखांना मिळणारी यंत्रसामुग्री 8 पट जास्त दराने घेऊन 38 लाख खर्चून बसवण्यात आली. शासनाच्या जेम पोर्टलवर अधिकृत ई टेंडरिंग करून या साहित्याची खरेदी होणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता फक्त ठेकेदाराकडून तीन वेगवेगळी कोटेशन घेऊन ही यंत्रणा बसवण्याची वर्कऑर्डर काढण्यात आली.

त्यामुळे शासनाचा तब्बल 33 लाखांचा तोटा झाला. कोरोनाच्या काळात दुकाने बंद असल्याचे कारण देत वस्तू चढ्या भावाने मिळत असल्याचे सांगण्यात आले. ठेकेदार संस्था माउली एंटरप्रायजेस आणि सिद्धांत एंटरप्रायजेसचा पत्ता एकच आहे. तिसरा ठेकेदार सॅम कॉम्प्युटर्सला सीसीटीव्ही विकण्याचा अनुभवही नाही.

फक्त नावाला त्यांचे कोटेशन घेण्यात आले आणि सिद्धांत एंटरप्रायजेसला 38 लाख 30 हजार 91 रुपयांचे काम देण्यात आले. या प्रस्तावाला मंजुरी देताना विभागीय उपसंचालकांनी ही खरेदी जेम पोर्टलवर ई टेंडरिंग करूनच करावी, असे नमूद केले होते. या घोटाळ्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post