। अहमदनगर । दि.04 जून । नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून आयसोलेशन साहित्याची चोरी करणारा आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. लखन अनिल घोरपडे (रा. भास्कर कॉलनी, लाल टाकी अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. 8 ते 29 मे दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलच्या वेटिंग रुमचा दरवाजा तोडून आयसोलेशन साहित्याची चोरी झाली होती. त्याची किंमत 81 हजार 115 रुपये इतकी होती. या प्रकरणी रोशी कैलास काला यांनी फिर्याद दाखल केली होती.
फिर्यादीनुसार लखन अनिल घोरपडे व मुरलीधर विश्वनाथ पाखरे या दोघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचा तपास वेगाने फिरविला असता लखन अनिल घोरपडे याला जेरबंद करण्यात आले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
पोनि. अनिल कटके यांच्या पथकातील पोहेकॉ. संदीप घोडके, पोना. संदीप पवार, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ. कमलेश पाथरट, योगेश सातपुते यांनी आरोपीला जेरबंद केले. आरोपीला तोफखाना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. आरोपीविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
