नगर-पुणे महामार्गावरील कामरगावचे कामक्षा देवी मंदिरात चोरी!

। अहिल्यानगर । दि.17 जुलै 2026 । नगर तालुक्यातील पुणे रस्त्यावरील कामरगाव (ता. नगर) येथील ग्रामदैवत कामाक्षा माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत मंदिराच्या गाभार्‍याचे कुलूप फोडून सोने-चांदीचे दागिने आणि पितळी मुकुट लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गुन्ह्यातील चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

या घटनेसंदर्भात संदीप रामचंद्र गुंजाळ (रा. कामरगाव, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मंदिर नेहमीप्रमाणे 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता बंद करण्यात आले होते. मात्र 17 जुलै रोजी पहाटे सुमारे पावणेचार वाजता सीसीटीव्ही फुटेज पाहताना मंदिराचे पुजारी दिनेश खाडे यांच्या पत्नी मंगल खाडे यांच्या निदर्शनास चोरीची घटना आली.

त्यानंतर पुजारी, मंदिर समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावले. पाहणी केली असता, मुख्य गाभार्‍याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केल्याचे आढळून आले. चोरट्यांनी देवीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची मण्यांची पोत, चार ग्रॅम वजनाच्या मुकुट असा एकूण सुमारे 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांच्या डायल 112 वर संपर्क साधण्यात आला. नगर तालुका पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post