पेट्रोल पंपावर उभ्या टॅँकरमधून 250 लिटर डिझेलवर चोरट्यांचा डल्ला

। अहमदनगर । दि.04 जून । संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील तिरुपती पेट्रोल पंपावर रात्रीच्यावेळी उभ्या केलेल्या सिमेंट वाहतूक करणार्‍या टँकरच्या टाकीतून अज्ञात चोरट्यांनी 250 लिटर डिझेलची चोरी केली. गुरुवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात डिझेल चोरांची टोळी सक्रीय असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे येथे तिरुपती पेट्रोल पंप आहे. या पंपावर गुरुवारी रात्री 3.30 वाजेच्या सुमारास कुमार सुर्वे (रा. सोलापूर) यांनी त्यांच्या ताब्यातील सिमेंट वाहतूक करणारा टँकर उभा केला होता. त्यानंतर चालक सुर्वे झोपी गेले. पहाटे 4 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी टँकरच्या टाकीतून 23 हजार रुपये किमतीचे 250 लिटर डिझेलची चोरी केली.

चालक सुर्वे यांना सकाळी झोपेतून उठल्यावर डिझेल चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला. यापूर्वीही अनेकदा तळेगाव दिघे येथील दोन्ही पेट्रोल पंपावरून रात्रीच्यावेळी मोठ्या वाहनांतून डिझेल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. चोरटे टिल्लू मोटारीच्या सहाय्याने मोठ्या वाहनाच्या इंधन टाक्यांमधून चोरटे डिझेल काढून घेतात. मात्र चोर्‍यांचा तपास लागलेला नसल्याने डिझेल चोरीचा सिलसिला सुरूच आहे.

Post a Comment

Previous Post Next Post