चार राज्यांकडूनही 12 वीची परीक्षा रद्द

गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि 

हरियाणा राज्यांनी केली घोषणा


।  नवी दिल्ली । दि.03 जून । कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर, देशातील चार राज्यांनीही ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणा या राज्यांनी राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणार्‍या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा बुधवारी केली. इतर अनेक राज्यांकडूनही बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत विचार सुरू आहे.

गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्र सिंग चूडासमा यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. केंद्राने घेतलेला निर्णय लक्षात घेत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाची (जीएसएचएसबी) 12 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे केंद्राकडून दिल्या जाणार्‍या दिशा-निर्देशांचे पालन केले जाईल, असे चूडासमा म्हणाले.

मात्र, दहावी व बारावीच्या परीक्षेला दुसर्‍यांदा बसणार्‍या विद्यार्थ्यांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकार्‍यांसोबतच्या बैठकीनंतर ट्विटरवर एक व्हिडिओ जारी करत बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण कोरोना स्थिती सामान्य झाल्यानंतर इच्छुक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post