पुढील 50 वर्षाचा विचार करून नविन भागामध्ये बायपास येथे कांबळेमळा, अरणगाव रोड परिसर व हनुमाननगर येथे 3 नवीन पाणी टाकीची निर्मिती करावयाची आहे. यासाठी जागेची पाहणी करून लवकरच टाक्याच्या कामांचा प्रस्ताव तयार करून मंजूरी घेतली, असे प्रतिपादन स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी केले.
केडगाव परिसरामध्ये नव्याने 3 पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे प्रस्ताव तयार करण्यासाठी कोतकर यांनी जागेची पाहणी केली. यंत्र अभियंता परिमल निकम, पाणी पुरवठा विभागप्रमुख आर.जी. सातपुते, अभियंता गणेश गाडळकर, सुधाकर भुसार, बाळू शिंदे, केशव हराळ आदी यावेळी उपस्थित होते.
कोतकर म्हणाले, केडगावचा झपाट्याने विकास होत असल्याने लोकवस्ती मोठया प्रमाणात वाढत आहे. यासाठी पाण्याच्या टाक्या बांधणे गरजेचे आहे. तीन टाक्यांच्या कामाचा प्रस्तााव तयार करण्याचे आदेश दिले. कायनेटीक चौक परिसरामध्येपाण्याची टाकी बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
परंतु या परिसरामध्ये आगरकर मळा, स्टेशन, इंडस्ट्रीयल एरिया परिसरामध्ये पाण्याची टाकी असल्याने या ठिकाणी नविन पाण्याची टाकीच्या प्रस्तावाला अडचण निर्माण होत असल्याने कायनेटीक कंपनी, इंदिरानगर व हनुमाननगर परिसरामध्ये पाण्याची टाकीचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
