शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेण्याचं आवाहन

48 तासात पावसाची शक्यता,  हवामान खात्याकडून अलर्ट जारी

 


पुणे, (दि.20 नोव्हेंबर) :  पुणे शहर परिसरात गेल्या पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे हवामान विभागाने पुढील दोन दिवस शहर परिसरात पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरंतर, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली पण 12 नोव्हेंबरपासून थंडी गायब झाली. 

 

यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत असून गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पुणेकरांनी आणि खासकरून शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात दक्षिण-पश्चिम पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तापमानात वारंवार वाढ होत आहे. यामुळे पुढील 48 तासांत याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टयात होणार आहे. त्यानंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरच्या सुमारास हा पट्टा ओमानच्या दिशेने पुढे सरकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

दरम्यान, राज्यात पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी. वेळीच तो कोरड्या जागी नेऊन ठेवावा अशा सूचना हवामान खात्याकडून करण्यात आल्या आहे. राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे तर दुसरीकडे दिवाळीचा उत्साह आहे. अशात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post