नगर, (दि.23 नोव्हेंबर) : गेल्या काही दिवसांपासून जिल्हयात बिबट्याचे हल्ले वारंवार कानावर पडत आहेत. यातुन बिबट्यची मोठी दहशत ग्रामिण भागात निर्माण झाली असून ग्रामिण भागात रात्री नागरीक घराबाहेर निघणे टाळत आहेत. जनावरांवर हल्ले होणे ही तर आता जिल्हयात कोठे ना कोठे नित्याचीच बाब झाली आहे.
अशीच एक घटना पारनेर तालुक्यातील जामगाव येथील राजवाडा परिसरात शिंदेवस्तीवर गोठ्यातील गायीवर बिबट्याने शनिवारी रात्री घडली आहे. माजी सरपंच दत्तात्रय सदाशिव शिंदे यांच्या घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या संकरित गायीवर या बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले आहे. या बिबट्यासह तीन पिल्लांचे या परिसरात वास्तव्य असून ते अनेकदा नागरिकांना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने वनविभागाकडे करण्यात आली आहे. आतापर्यंत त्यांनी परिसरातील अनेक कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. हा या बिबट्यानेच पाडला असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
