चव्हाणांना हटविण्याची मागणी केल्यानेच माझी नियुक्ती रद्द : पाटील

 


मुंबई, (दि.13 नोव्हेंबर) : आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा अद्यादेश काढण्यात आला आहे. त्यानंतर, या महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे. मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष पदावरुन अशोक चव्हाण यांना हटविण्याची मागणी लावून धरल्यामुळेच माझी अध्यक्षपदावरील नियुक्ती रद्द केल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, अशासकीय सदस्य, विशेष निमंत्रित यांच्या नियुक्त्या महायुतीच्या सरकारच्या काळात करण्यात आल्या होत्या. महामंडळाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाची दखल घेऊन राज्यात नवीन सरकारने त्यांना एक वर्ष आणखी काम करण्याची संधी दिली. त्यानंतर या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपणास कशामुळे हटविण्यात आले हे सांगितले. त्यावेळी, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुनच हे राजकारण झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवा ही मागणी लावून धरल्यामुळेच महामंडळ अध्यक्षपदाची नियुक्ती रद्द केली. लवकरच माजी मुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांची भेट घेऊन भूमिका जाहीर करणार, असेही नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post