नवी दिल्ली (दि.13 नोव्हेंबर) : ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे बिहार निवडणुका जिंकण्याचे रहस्य आहे. बिहारमधील विकासकामांचा हा विजय आहे. बिहार सर्वात खास आहे. बिहारमध्ये सत्य जिंकले. बिहारमध्ये विश्वास जिंकला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या विजयाचे विश्लेषण करताना सर्व मतदारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
बिहार विधानसभा निवडणूक तसेच विविध राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकीतील यशाबद्दल भाजपाकडून दिल्लीतील मुख्यालयात बुधवारी सायंकाळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आदी उपस्थित होते.
बिहारमधील विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकीतील यशानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासियांचे आभार मानले. निवडणुकीत यश मिळाले यासाठी नाही तर लोकशाहीचा उत्सव साजरा केला याबद्दल मी आभार मानत असल्याचे मोदींनी सांगितले. मंगळवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत सर्वांच्या नजरा टीव्ही आणि ट्विटरवर होत्या. लोकशाहीबद्दल भारतीयांचा जो विश्वास आहे तो जगात कुठेही पहायला मिळत नाही. विजय, पराभव आपल्या जागी आहे पण निवडणूक प्रक्रिया सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे, असे मोदींनी सांगितले.
