नगर, (दि.20 नोव्हेंबर) : राजेगाव (ता. नेवासा) येथे अनेक दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण करीत असलेल्या बिबट्या अखेर वन विभागाने सोमवारी रात्री पकडला.
मागील महिन्यापासून राजेगाव, शिंगवे तुकाई व पांगरमल परिसरात रोजच बिबट्याचे दर्शन होत होते. त्याने अनेक शेळ्या-मेंढ्या व कुत्री फस्त केली आहेत. बिबट्याच्या भीतीने शेतीची कामेही ठप्प झाली होती.
ग्रामस्थांच्या मागणीनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मुश्ताक सय्यद, कर्मचारी चांगदेव ढेरे, ज्ञानदेव गाडे, सयाजी मोरे, चंद्रकांत गाडे, मुक्ताजी मोरे यांनी अजय आव्हाड यांच्या वस्तीजवळ चार दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता.
सोमवारी (दि. 16) रात्री दहा वाजता तीन वर्षे वयाचा मादी बिबट्या पिंजर्यात ठेवलेल्या शेळीच्या आवाजाने आला. झेप घेतली आणि पिंजर्यात अडकला. या बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.
