नगर, (दि.03 नोव्हेंबर): महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे, जिल्हा संपर्कप्रमुख अनिल चितळे, प्रदेश उपाध्यक्ष डी. एन. साबळे, ज्ञानेश्वर गाडे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, देवीदास खेडकर, दत्ता कोते, बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव नितीन भुतारे, अॅड. अनिता दिघे, मनोज राऊत, मारूती रोहोकले, पप्पू लामखेडे, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, नितीन म्हस्के, बाबासाहेब माळी आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी दिलीप धोत्रे म्हणाले की, महाराष्ट्रातील लाखो माता भगिनींनी महिला बचत गटाच्या माध्यमातून फायनान्स कंपन्यांकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. गेली दहा ते पंधरा वर्षे झाले हे कर्ज घेत असून, ते नियमितपणे परतफेड करत आलेले आहे. हे कर्ज घेत असताना फायनान्स कंपनी प्रत्येक महिलेकडून दिलेल्या कर्जाची सुरक्षा म्हणून दरवर्षी विमा पॉलिसीच्या नावाखाली हजारो रुपये घेतात. परंतु विम्याचे सर्टिफिकेट देत नाही. कोरोनाच्या या संकटामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद पडले आहे.
कोणाच्याही हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अनेक लोकं आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत आहे. महाराष्ट्रातील लाखो महिलांनी कर्ज घेतले आहे. पण व्यवसायच बंद पडल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाही. अनेक महिलांनी कर्ज घेऊन लोणचे, शेवया, पापड यासारखे पदार्थ तयार केले होते.
परंतू लॉकडाऊनमुळे तो माल विकला गेला नाही. सहा महिन्यात तो माल पूर्णपणे खराब झाला त्यामुळे त्या महिलेने घेतलेले पूर्ण कर्ज म्हणजे तिचे भांडवल बुडाले आहे. ती महिला पूर्ण संकटात सापडली आहे. महिला बचत गटांचे कर्ज माफ कराण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.