जळगाव, (दि.19 नोव्हेंबर) : शहरात दोन ठिकाणी सुरु असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकला. सोमवारी मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या 50 जणांना अटक करण्यात आली.
कोंबडी बाजारातील जेएमपी मार्केट आणि मनीष कॉम्प्लेक्स येथे हे छापे टाकण्यात आले. यावेळी एकूण 21 लाख 52 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल तसेच 2 महागड्या कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील कोंबडी बाजारातील जेएमपी मार्केट आणि मनीष कॉम्प्लेक्स येथे हायप्रोफाईल जुगाराचे अड्डे सुरु असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यानंतर, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री जेएमपी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावर छापा टाकला.
त्यानंतर दुसरी कारवाई मध्यरात्रीनंतर 2 वाजता जुने बसस्थानक परिसरातील मनीष कॉम्प्लेक्स येथे करण्यात आली. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी 2 महागड्या कार तसेच 14 दुचाकी जप्त केल्या. या दोन्ही कारवाईप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 50 जणांविरुद्ध दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
